उस्मानाबाद - राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर आता मंदिर उघडण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे. तुळजाभवानी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. तब्बल 8 महिन्यानंतर राज्यातील मंदिरासह तुळजाभवानी मंदिर खुले होणार आहे. यासाठी मंदिर प्रशासन कामाला लागले असून छोटे-मोठे व्यवसायिक आणि दुकानदार आपली दुकाने सज्ज करून बसले आहेत.
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुकान उघडण्यासाठी शिथिलता देण्यात आली होती. मात्र मंदिर बंद असल्याने तुळजाभवानीचे भक्त तुळजापूर येथे येत नव्हते. त्यामुळे या व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागला होता. मात्र आता मंदिर सुरू होणार असून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. तर दररोज साधारण 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली असल्याचे सांगितले जात आहे.
पहाटे ५ पासून रात्री ९ पर्यंत दर्शन...
तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईटवर दररोज 1 हजार पेड दर्शन पास आणि 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रति 2 तासाना 500 भाविकांनाच दर्शन मिळणार आहे. तुळजाभवानी भक्तांना देवीचे मुखदर्शन मिळणार मात्र मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसून ऑफलाईन मोफत दर्शन पास मंदिर परिसरात काढता येणार आहेत. तुळजाभवानी मंदिरात पहाटे ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
संसर्ग टाळण्यासाठी मंदिरात स्वच्छता राखण्यात येणार
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई, स्वच्छता व सॅनिटायझर व्यवस्था करण्यात येत आहे. तर 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे. तसेच दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच भाविकांना तुळजाभवानीचे दर्शन घेता येणार आहे.
हेही वाचा - वन्य प्राण्यांपासून पिकांच्या बचावासाठी अनोखी शक्कल.. टाकाऊपासून टिकाऊ बुजगावणे
हेही वाचा - कोरोनाच्या सावटाखाली सजला दिवाळीचा बाजार; खरेदीसाठी नागरिकांनी पाळला संयम