उस्मानाबाद - आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोना विषाणूमुळे राज्यासह देशातील सर्व मंदिरे बंद आहेत. याचा परिणाम विविध ठिकाणच्या लहान-मोठ्या उत्सवांवर झाला आहे. याच अनुषंगाने आता तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव यंदा साधेपणाने साजरा होणार आहे. नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिरासह तुळजापूरातच प्रवेशबंदी असेल, अशी माहिती मंदिर व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी दिली आहे.
नवरात्र काळात भाविकांना दर्शनासाठी तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही. नवरात्रात देवीच्या पूजा कुलाचार हे दरवर्षी नियमाप्रमाणे होतील. मात्र सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द कऱण्यात आले आहेत. उत्सवादरम्यान पुजारी, मानकरी व मंदिर प्रशासनातील अधिकारी यांच्यापेक्षा जास्त व्यक्तींना या उत्सवात सहभागी होता येणार नाही. तसेच रॅपिड अँटिजन टेस्टशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे तांदळे यांनी सांगितले.
नवरात्र काळात भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळ व भविकांना देखील तुळजापूर शहरात प्रवेश दिला जाणार नाही.