उस्मानाबाद - शारदीय नवरात्र महोत्सवात शुक्रवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. तुळजाभवानीच्या नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.
या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या 'मळ' पासून दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेवानी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीस जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध तुळजाभवानीने केला. म्हणून विष्णूनी आपले शेष शैया तुळजा भवानी देवीला विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.
शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधी पार पाडले जातात. त्याचबरोबर आज भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 06 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. दरम्यान, गुरूवारी रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक (वाहन राजहंस) काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.