उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका महिलेने घराताच गावरान कोंबड्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करुन हजारो रुपये कमवले आहेत. त्यांनी घरातील टाकाऊ वस्तू वापरून घरबसल्या हा व्यवसाय सुरु केला होता. आता सध्या त्यांचा हा व्यवसाय चांगलीच भरारी घेत आहे.
राधिका देढे, अस या उद्योजिकेचे नाव आहे. तर त्यांच शिक्षण हे फक्त ६ वी पास आहे. राधिका यांचे पती गणेश देढे उच्च शिक्षित आहेत. यांचे बीएड झाले असून, त्यांनी एम.ए.ची पदवी घेतली आहे. मात्र, ते सध्या शेती करतात. तर राधिका अल्प शिक्षित असल्याने त्या घरी बसूनच होत्या. त्यामुळे त्यांनी काहीतरी व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने ३ हजार रुपयांची गुंतवणूक करून १५० गावरान कोंबड्या खरेदी केल्या. त्यावेळी त्यांच्यासमोर एवढ्या कोंबड्या ठेवायच्या हा प्रश्न होता. त्यवेळी त्यांनी शेड न बांधता या सर्व कोंबड्या घरातच ठेवल्या.
सुरवातीला खरेदी केलेल्या १५० कोंबड्यातून ५० दिवसात राधिकांना जवळपास ४० हजार रुपये मिळाले. यामधून त्यांनी आणखी काही गावरान कोंबड्या खरेदी केल्या. त्याबरोबर घरासमोर एक छोटस पत्र्याचे शेड उभे केले. तर उन्हाळ्यात कोंबड्यांना त्रास होवू नये म्हणून लग्नात आहेर म्हणून आलेला टेबल फॅन बसवला. या ठिकाणी वातावरण थंड राहावे, म्हणून या फॅनला सलाईनने ड्रीप केले. शेतातील पाईप कट करून कोंबड्यांना त्यामध्ये खाद्य ठेवले जाते.
राधिका यांच्याकडे सध्या २५० कोंबड्या आहेत. यामधून त्यांना ६० हजार रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. सर्व खर्च वजा करता महिन्याकाठी राधिकांना घरी बसून ७ ते ८ हजार रुपये मिळतात. या कामात त्यांना त्यांचे पती गणेश मदत करतात. जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट करायची तयारी आपल्याकडे असेल त्या साधनातून यश मिळवता येते, हे राधिका यांनी दाखवून दिले आहे.