उस्मानाबाद - मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्हा दुष्काळामुळे हैराण झाला आहे. वर्षानुवर्षे कमी होत चाललेला पाऊस, खालावत चाललेली पाणी पातळी आणि अचानक होणारी गारपीट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र, भूम तालुक्यातील एका शेतकऱयांने दुष्काळावर मात करत आपल्या शेतामध्ये अंजीर आणि चिकूची बाग फुलवली आहे.
ताहेर पटेल ( शेकापुर, तालुका भूम) या शेतकऱ्याने आपल्या शेतात आणि चिकूची आणि अंजीर या फळपिकांची लागवड केली. या दोन्ही फळ पिकांची लागवड करून जवळपास १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही या पिकातून ताहेर पटेल व मुजावर पटेल हे बंधू लाखो रुपये कमवतात.
ताहेर पटेल यांना 'उद्यान पंडित' हा पुरस्कारदेखील मिळाला आहे. पटेल यांचे कुटुंब एकत्रित असून त्यांच्या मदतीसाठी त्यांचे लहान भाऊ असतात. अंजिरबरोबरच चिकू या फळपिकाची जबाबदारी मुजावर पटेल यांच्यावर आहे. त्यांच्या या शेतामध्ये बागा फुललेल्या असल्यामुळे भर उन्हाळ्यातही डोळ्यांना सुखावणारे चित्र येथे पाहायला मिळते.