उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच उस्मानाबादमध्ये रोज नवनवीन आदेश काढण्यामुळे चर्चेत असणाऱ्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आणखी एक नवा आदेश काढला आहे. आज(बुधवार)पासून जिल्ह्यातील दुकाने 9 ते 3 पर्यंतच सुरू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी मुंडे यांनी काढला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, आता सकाळी 9 ते 7 पर्यंत सुरू असणारी दुकाने आता 9 ते 3 या वेळेत सुरू राहणार आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याचे कारण देत हा आदेश काढला असून अत्यावश्यक सेवा सुविधा आणि मार्केटबाबत जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक व्यापारी आणि नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे. यात प्रामुख्याने अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकानेही आता 3 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर 3 च्या नंतर फिरण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
रुग्णसंख्या वाढत असेल तर आरोग्य सेवा पुरवल्या जाव्यात, मार्केटच्या वेळेत बदल करून नागरिक व सामान्य जनतेचे हाल करू नये, अशी व्यथा व्यापाऱ्यांनी मांडली आहे. व्यापारी आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असली तरी प्रशासनाने जो आदेश काढला आहे, त्याचे पालन करणे गरजेचं असून न केल्यास कायदेशीर कारवाईला समोर जावे लागले, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.