उस्मानाबाद - घरासमोर आणि परिसरात सांडपाणी साचत असल्याने बाप लेकीने तोंडाला काळे फासून आंदोलन सुरू केले आहे. उमाकांत लांडगे असे आंदोलनकर्त्याचे नाव असून त्यांच्या सोबत लहान मुलीने या आंदोलनात सहभाग घेतला आहे. वॉर्ड क्रमांक 13 मध्ये त्यांच्या मालकीची जागा आहे. याच जागेत वॉर्डातील इतर लोकांचे घाण सांडपाणी येते.
त्याचबरोबर जवळच असलेल्या बोअरचे पाणी साचून कंपाऊंडची भिंत खचली आहे, यामुळे नगरपंचायत मध्ये वेळोवेळी तक्रार अर्ज केले, निवेदने दिले मात्र तरीही लांडगे यांच्या जागेत येणारे घाण पाणी थांबले नाही, सुस्त झालेल्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने लांडगे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज उमाकांत यांनी आपल्या मुलीला घेऊन स्वतःच्य आणि मुलीच्या तोंडाला काळे फासून हे अनोखे गांधीगिरी आंदोलन सुरू केले. लोहारा नगरपंचायतच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले असून यानंतरही मागणीकडे दुर्लक्ष केले तर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.