उस्मानाबाद - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रलंबित कामासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय बैठक घेऊन रुग्णांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महिला रुग्णालयात अतिरिक्त 100 खाटसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.
जिल्हा नियोजन बैठकीसाठी पालकमंत्री खोतकर उस्मानाबाद येथे आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
सध्या या महिला रुग्णालयात 65 खाटा आहेत. त्यामुळे अनेक गर्भवती महिला एकाच खाटेवरती दोन-दोन महिला उपचार घेतात. तर काही वेळेस तर जमिनीवर झोपून महिलांना उपचार घ्यावे लागत होते. या महिला रुग्णालयासाठी अतिरिक्त 100 खाटांची मान्यता मिळाली होती. मात्र, निधीअभावी काम पूर्णत्वास जात नव्हते. त्यामुळे आता 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पालकमंत्री खोतकर यांनी दिली आहे.