उस्मानाबाद - गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला असून पेरणीची लगबग सुरू झाली आहे. काल आणि परवा झालेल्या पावसाने जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदी दुधडीभरून वाहत आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पावसावर अवलंबून असणारे अनेक शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, यंदा पहिल्याच पावसात जिल्ह्यातील नद्या प्रवाहित झाल्याने शेतकरी आनंदात आहेत. वेळेवर समाधान कारक पाऊस झाल्याने पेरण्यादेखील वेळेत होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतींच्या कामांमध्ये व्यस्त असून लवकरच पेरण्या सुरू होतील.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 18 तारखेपर्यंत सर्वदूर 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडेल. याच काळात काही ठिकाणी 64.5 मिलिमीटर ते 115.5 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.