उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमाचीवाडी शिवारातला कलावंतिणीचा महाल परिचित वास्तू आहे. याच पुरातन वास्तुत गुप्तधनासाठी खोदकाम झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भूम तालुक्यातील उमाचीवाडी शिवारात एका छोट्या टेकडीवर पुरातन वास्तुचे मोडकळीस आलेले अवशेष आहेत. या वास्तूला कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखले जाते. येथे ७ रांजण भरुन सोने पुरल्याची कथा सांगितली जाते. या ठिकाणी गुप्तधन शोधण्यासाठी खड्डा खोदुन त्याशेजारी लिंबू, नारळ व पूजा केल्याचे दिसून येत आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी रांजणाचे अवशेष देखील आढळून आले आहेत. त्यामुळे हा प्रकार गुप्तधनासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या महालाच्या मधोमध २ ठिकाणी खोदकाम झाल्याचे गुरुवारी काही नागरिकांच्या निदर्शनास आले. या दोन्ही खड्ड्यांच्या जवळ नारळ, लिंबू, पाण्याच्या बाटल्या, हळदी-कुंकू इत्यादी साहित्य आढळून आले, तसेच पूजा बांधलेलीही दिसून आली. तर, शेजारीच २ फुटलेल्या रांजणाचे अवशेष आढळून आल्याने नागरिकांनी ही घटना तातडीने पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, हा प्रकार गुप्तधनासाठीच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.