उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील बहुला गावात मोराची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पक्षी प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
कळंब तालुक्यात झालेल्या पावसामुळे सध्या सर्वत्र निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे. जंगलात मोर, हरीण यांच्यासह वन्यजीवांचा वावर वाढला आहे. मात्र, कोरोनामुळे काही प्रमाणात लॉकडाऊन असल्याने मानवी वस्तीमध्ये शांतता आहे. यामुळे अशा परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला दिसत आहेत. बहुला गावालगतच्या जंगल परिसरात मोरांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. मात्र, काही अज्ञांताकडुन या परिसरात मोराची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात माहीती मिळताच, पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शिकार झालेल्या मोराची पाहणी केली. मांस खाण्यासाठी मनुष्याकडून फिरणाऱ्या प्राण्यांची शिकार केली जाते. त्यामुळे या हेतूने मोराची शिकार करण्यात आली आहे का? या दृष्टीने तपास सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मृत मोराला ताब्यात घेऊन कळंबमधील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असुन याचा तपास करूण संबधितावर कारवाई करावी, अशी मागणी पशुप्रेमींकडुन करण्यात येत आहे.
हेही वाचा - गोंदियात परदेशी पक्ष्यांचे आगमन; 20 वर्षानंतर जिल्ह्यात आढळले ग्रेटर फ्लेमिंगो