उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांनी 13 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात बरे झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चांगली असली तरी कोरोनामुक्त रुग्णांच्या त्रासात इतर आजारांची भरच पडली आहे. सध्या या रुग्णांना वेगवेगळ्या इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबात 'ईटीव्ही भारत'ने कोरोनामुक्त होवून बऱ्या झालेल्या रुग्णांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती घेतली आहे.
शहरातील सतीश (नाव बदललेले आहे) यांना 5 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. साधारणपणे नऊ दिवसांनी सतीश यांना रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आले. दीड लाख रुपये खर्च करून आणि योग्य उपचार घेतल्यानंतरही सतीश यांना अजूनही शारीरिक समस्या जाणवू लागल्या आहेत. पॉझिटिव्ह होऊन महिना ओलांडला आहे तरीही थकवा जाणवतो, वारंवार धाप लागते, थोडेसे अंतर चालले की पाय दुखतात, श्वास घेताना अडकल्या सारखे वाटते व तापही येतो असल्याचे सतीश म्हणाले.
याबाबत डॉक्टरांना पुन्हा भेटल्यानंतर डॉक्टरांनी होम ऑक्सिजन थेरपी घेण्याचा सल्ला दिला. मात्र, जिल्ह्यात सध्या 10 हजार 701 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यातील बहुतांश रुग्णांना कोरोना नंतरच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही रुग्ण अशा आजाराला अंगावरच काढत आहेत. तर सतीश यांच्या प्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णाला घरगुती ऑक्सिजन थेरपी आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर नाही.
याबाबत भाजपच्या दत्ता कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कोरोना रुग्णांसाठी पोस्ट कोविड सेंटर उभा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांना नैराश्य येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार या आजाराचे परिणाम दीर्घकाळ राहतात. त्यामुळे या काळात रुग्णांना मानसिक आधार देऊन समुपदेशन करण्याची गरज असल्याचे मत कुलकर्णी यांचे आहे.
हेही वाचा - उस्मानाबादेत कृषी कायद्याला राज्याने दिलेल्या स्थगिती आदेशाची होळी...