उस्मानाबाद : रामदासी संप्रदायाच्या मठाची चारशे एक्कर जमीन ( Four hundred acres of land ) परस्पर विकण्याचा प्रकार उस्मानाबादमध्ये समोर आला आहे. या विक्रीतून चारशे कोटीपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाला असून हे व्यवहार रद्द करावेत यासाठी मंदिर संस्थान प्रशासनाच्या दारी खेटे मारत आहेत. खंडाने कसण्यासाठी दिलेल्या जमिनीची गैरमार्गाने विक्री होत असून ती थांबवण्याची विनंती मंदिर संस्थानचे विश्वस्थ रामचंद्र गोसावी ( Ramachandra Gosavi Trustee of Temple Sansthan ) यांनी प्रशासनाकडे केली आहे.
मुळ गादी सज्जनगडला : उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा येथे रामदासी संप्रदायाचा तीनशे वर्ष जुना मठ आहे. समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य कल्याणस्वामी होते. त्यांचे पट्टशिष्य जगनाथ स्वामी यांनी हा मठ याठिकाणी बांधून रामदासी संप्रदायाचे प्रचार आणि प्रसाराचे काम केलं आहे. या संप्रदायाचा प्रसार देशभर असून तेराशे पेक्षा जास्त मठ देशात आहेत. खासकरुन मध्यप्रदेशात हा संप्रदाय मोठा आहे. यामठाची मुळ गादी सज्जनगड सातारा जिल्ह्यात आहे.
जमीनवर पाडले प्लॉट : या मठाची सतराशे एक्कर जमीन उस्मानाबाद तालुक्यातील सांजा, कावळेवाडी, दाऊतपुर आणि खामगाव या चार गावात असून मठाने जमिनी याच गावातील काही लोकांना नाममात्र खंडाने कसण्यासाठी दिल्या होत्या. परंतु श्रीराम मंदिर संस्थानची म्हणजे रामदासी संप्रदायची 400 एक्कारपेक्षा जास्त जमीनवर प्लॉट पाडून विक्री केल्याची बाब समोर आली आहे. हे काम तहसीलदार तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवकास हाताशी धरून करण्यात आल्याचा आरोप मंदिर संस्थानचे विश्वस्थ रामचंद्र गोसावी यांनी केला आहे. यात चारशे ते पाचशे कोटींचा आर्थिक व्यवहार झाला असून हे झालेले व्यवहार रद्द करून जमीन परत मंदिर संस्थानला मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. अशी मागणी गेल्या तीन वर्षापासून मंदिर संस्थान जिल्हा प्रशासनाकडे करत आहेत. परंतु त्यांना दाद दिली जात नसल्याचे विश्वस्थ सांगत आहेत.
प्रशासन मदत करणार : प्रशासन मात्र असे व्यवहार होत आहेत हे मान्य करत आहे. असे व्यवहार बेकायदेशीर आहेत ते होऊ नयेत म्हणून आम्ही मंदिर संस्थानला आवश्यक असलेली मदत करू शासनाच्या आदेशानुसार मंदिरच्या जमिनी मंदिर संस्थांच्या ताब्यात देणे तसेच त्यासाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त देऊन मंदिर संस्थानला त्या जमिनीचा ताबा देण्यासाठी मदत करणार असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले.