उस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील एका तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना काल गुरुवारी घडली. त्यामुळे या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रात्री दहाच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मुकुंद शहाजी यल्लाळ या तरुणाला अपसिंगा येथे येऊन काठीने, लाथा-बुक्क्यांनी, बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने का मारताय, असा प्रतिप्रश्न केला. मात्र याचे कोणीही ऐकून घेतली नाही. त्याचबरोबर मारहाण करत दरोड्याच्या व चोरीच्या गुन्ह्याखाली तुला अटक करतो अशी धमकी देत, या तरुणाला जखमी केले. विशेष म्हणजे या तरुणाच्या पायाला दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करून गुडघ्यामध्ये रॉड टाकण्यात आला होता आणि त्याच पायावरती पोलिसांनी मारहाण करून जखमी केले आहे.
पोलिस अपसिंगा येथे कशासाठी गेले हाच प्रश्न ?
अपसिंगा येथे एवढ्या रात्रीच्या वेळी नेमका कोणत्या तपासासाठी हे पोलीस आले हा प्रश्न आहे. कारण या तरुणाला अगदी कुठलीही माहिती नसताना गावात झालेल्या पूर्वीच्या भांडणा बद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली व तूच आरोपी आहेस असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही पोलीस नेमकी कशासाठी येथे आले होते हा प्रश्न उपस्थित होत आहे.