उस्मानाबाद - लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरती झालेला भूकंपाला आजही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हटले जाते. 30 सप्टेंबर 1993ला पहाटे 3 वाजून 56 यांनी 6.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आणि क्षणात सर्वकाही बदलू गेले. या भूकंपाच्या वेदना आजही उस्मानाबादकरांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यानंतर अनेकदा जिल्ह्याला कधी दुष्काळाने तर, कधी अतिवृष्टीने झोडपून काढले. अनेक शेतकऱ्यांनी गळफास लावत आत्महत्या केल्या. यात भर म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचे संकटही आले. त्याचाही सामना उस्मानाबादकर करत आहेत.
भूकंपाच्या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये 10 हजारपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला, तर 30 हजारांपेक्षा जास्त जखमी झाले. 52 खेडी यात नष्ट झाली होती. त्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2020 यादरम्यान 96 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्यांचा आलेख दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र, यातील मोजक्याच म्हणजे फक्त 18 आत्महत्यांना शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदवले गेले. बाकीच्या 78 आत्महत्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत.
आता भूकंप, दुष्काळ आणि अतिवृष्टीनंतर मोठे संकट म्हणून कोरोनाकडे पाहिले जात आहे. आतापर्यंत 11 हजार 983 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 367 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे दीड लाखापेक्षा अधिक नागरिक पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून कामधंदासोडून परत जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. 1993 सालच्या भूकंपाची जखम आजही भळभळत असताना कोरोनाने या जखमेवरती जणू काही मीठ चोळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.