उस्मानाबाद-जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. आज (बुधवारी) दिवसभर देखील पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. बळीराजा हवालदिल झालाय. लोहारा तालुक्यातल्या वडगाव गांजा या गावात तब्बल 200 एकरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेलीये. पाण्याखाली गेलेल्या क्षेत्रात सोयाबीन, उस या मुख्य पिकांसह इतर पिकांचा समावेश होता. पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. अल्प पावसाचा पिकांना फटका बसला. आणि आता ऐन पीक काढणीच्यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
दरम्यान दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या पाणी महालाच्यावरून पाणी वाहत असल्याचे पहायला मिळत आहे. या पाणी महालाच्या दोन्ही बाजूने नर-मादी धबधबा वाहतो, तर या दोन्ही धबधब्यांच्या मध्ये पाणीमहाल बांधण्यात आला आहे. नर- मादी धबधबा आणि पाणी महाल पहाण्यासाठी राज्यभरातून पर्यटक इथे गर्दी करत असतात, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने हा धबधबा कोरडा पडला होता. यदा चांगला पाऊस पडत असल्याने दोन्ही धबधबे ओसडून वाहत आहेत.