उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 24 तासात उपचारादरम्यान हे दोन मृत्यू झालेत. यासह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 5 जणांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
यातील एक रुग्ण शहरातील धारासुरमर्दिनी देवी रोड भागातील होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला कॅन्सर होता. त्यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, दुसरा कोरोनाबाधित रुग्ण उस्मानपुरा भागातील होता. या 50 वर्षीय पुरुषाला मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता. त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. हा रुग्ण नळदुर्ग येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले जात आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे रुग्ण राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. मृतांमध्ये वयोवृद्ध रुग्णांचे आणि आधीपासून इतर काही आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशभरात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. मात्र, यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरांतून ग्रामीण भागांकडे लोक स्थलांतरित झाल्यामुळे तेथेही कोरोनाबाधित आढळून येत आहेत.