उस्मानाबाद - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांना तसेच इतर जिल्ह्यावासियांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी शासनाने सोय उपलब्ध करून दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही मुंबई-पुण्याहुन नागरिक परत येत आहेत. मात्र, बाहेरून येणारे नागरिक सध्या जिल्हावासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
जिल्ह्यातील कळंब तालुक्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून जिल्ह्यात खळबळ माजली आहे. तर, कळंब तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो आहे. एकट्या कळंब तालुक्यात आतापर्यंत ६ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून ती लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे उपचार घेत आहे. सदर महिला ही काही दिवसांपूर्वी पुण्यावरून परत आली होती. प्रशासनाने खबरदारी घेत युद्धपातळीवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
रुग्णांची वाढती संख्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. जिल्ह्यातील उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यातील पूर्वी 3 कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र, ते आता बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील हे तीन रुग्ण गृहीत धरल्यास रुग्णसंख्या १६ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना म्हणून त्या त्या भागात अत्यावश्यक सेवेसह काही महत्वाच्या आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.