उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये बुधवारी काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यात उस्मानाबाद, तुळजापूर, वाशी या तालुक्यांसह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
एकीकडे कोरोनाचे सावट सर्वत्र पसरले असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे आगमन होऊ लागले आहे. बुधवारी जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर आदी तालुक्यांसह इतर काही भागांना वादळी वारे आणि विजेचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
यामध्ये उस्मानाबाद शहरातील गालिब नगर परिसरात नारळाच्या झाडावरती वीज पडली. यावेळी नारळाचे झाड पूर्णपणे जळून राख झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने आगमन केले असून या अवकाळी पावसामुळे फळ पिकांबरोबरच रब्बी पिकांनाही याचा फटका बसतो आहे.