उस्मानाबाद - सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय माहामार्गाचे काम हे अर्धवट असतानाच 'सोलापूर टोलवेज' या कंपनीने टोलवसुली सुरू केली. आता याच टोलवसुलीविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन सुरू केले आहे. तसेच या आंदोलनासाठी उमरगा शहरातील नागरिकही आक्रमक झाले आहेत. रस्ता पूर्ण करा व नंतर टोल घ्या, या मागणीसाठी आज(मंगळवार) सोलापूर - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादीच्यावतीने रास्तारोको करण्यात आला.
हेही वाचा - साताऱ्याच्या अश्विनी पाटील अडकल्या चीनमध्ये; व्हिडिओ कॉलद्वारे भारत सरकारकडे मदतीची याचना
रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच उमरगामधील तलमोड येथे टोलनाका सुरू करण्यात आला आहे. तो टोलनाका बंद करा व रस्ता पूर्ण करा, ही मागणी घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने या आंदोलनाची दखल न घेता टोल बंद नाही केला तर आम्ही हा टोलनाका बंद पाडणार असल्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. या अगोदर शिवसेना व इतर राजकीय पक्षांनीही या टोल व रस्त्याच्या कामाला घेऊन आंदोलन केले आहे. दरम्यान, अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.