उस्मानाबाद- केंद्र सरकारने संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलच्या दरात अन्यायकारक वाढ करून सामान्य जनतेची लूट चालवली आहे. ही दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, यासाठी कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपतींना पाठवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, कळंब यांच्याकडे निवेदन देण्यात आले. हे निवेदन देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी बैलगाडीचा वापर केला गेला.
बैलगाडीमध्ये बसून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले होते. राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सन 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव ज्यावेळी 140 डॉलर प्रती बॅरल होते. त्यावेळी देशात पेट्रोल 80 रुपये लिटर होते व डिझेल 68 रुपये लिटर विकले जात होते.
आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत ३० ते ४० डॉलर प्रती बॅरल एवढी खाली आलेली असताना सुद्धा केंद्र शासनाने भरमसाठ दरवाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या-किमतीत दरवाढ करून सामान्य जनतेची लूट चालवली आहे. त्यामुळे देशात महागाई देखील वाढली आहे. ही महागाई कमी करण्यासाठी व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलची अन्यायकारक भाववाढ रद्द करावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.प्रतापसिंह पाटील, डॉ.संजय कांबळे गुणवंत पवार, श्रीधर भवर, अॕड.प्रवीण यादव, तारेख मिर्झा, यांच्यासह महिला व इतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.