उस्मानाबाद - कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने काही नियम घालून दिले आहेत. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, हात स्वच्छ धुवा याबरोबरच सोशल डिस्टन्स ठेवा असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, हे नियम पायदळी तुडवण्यात महाविकास आघाडीचेच मंत्री आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात महविकास आघाडीच्या ४ मंत्र्यांनी जिल्हा दौरा केला. यात प्रामुख्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही कोरोनाच्या वाढत्या आलेखाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री शंकर गडाख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीदेखील जिल्हा दौरा करत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, या चारही मंत्र्यांनी जिल्ह्यात आल्यानंतर सोशल डिस्टन्स पूर्णतः पायदळी तुडवला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांच्यासह जिल्ह्यातील इतरही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सर्वसामान्य लोकांना संसार्गाच्या नियमाखली भरडले जात आहे. नियम मोडले म्हणून गुन्हे दाखल केले जात आहेत, मात्र हे सर्व नियम सामान्य लोकांनाच आहेत का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
स्वतः राज्य सरकारने बनवलेल्या नियमानुसार राजकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ नये, असा दंडक आहे. मात्र, या आलेल्या मंत्र्यांनी स्वतःच्या पक्षाच्या आढावा बैठका घेत स्वतः च्या सरकारनेच घालून दिलेले नियम फाट्यावर मारला आहे.