उस्मानाबाद - जिल्ह्यातील अनेक गावात गेल्या अनेक महिन्यांपासून गुढ आवाज होत आहेत. त्यामुळे हा होणारा आवाज नेमका का होतोय कुठून येतोय भूगर्भातून होत आहे की आकाशातून? याचे काय कारण असेल याची चर्चा रंगली आहे. सातत्याने गूढ आवाज ऐकायला मिळत असून जिल्ह्यातील कळंब, वाशी, भूम, परंडा, लोहार, तुळजापूर, उस्मानाबाद, या सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुढ आवाज ऐकायला येत आहे. हा आवाज नेमका येतोय तरी कुठुन? याचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिकांध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक-दोन दिवसाच्या फरकाने जिल्ह्यातील बऱ्याच भागात हा आवाज जाणवतो आहे. जिल्ह्यातील परांडा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा आवाज झाला आणि या आवाजामुळे खिडक्यांची तावदाने हादरली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली होती. या सर्व परस्थितीमुळे नागरिक मात्र चांगलेच भयभीत झाले आहेत. या आवाजाची मालिका सातत्याने सुरूच आहे. मागील काही महिन्यांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज ऐकायला मिळाले. त्यामुळेच १९९३ च्या भूकंपाची पार्श्वभूमी असणाऱ्या या परिसरातील लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जमीन हादरली, मोठा आवाज झाला, घरावरील पत्रे हलले आणि घरातील भांडी या हादऱ्यामुळे पडली, असे प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत आहेत. परिसरातील जुन्या-जानत्या लोकांनी १९९३ च्या भूकंपाचा दाखला दिला आहे.