उस्मानाबाद - जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आली असून उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत.
पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक म्हणून दिवेगावकर यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी यापूर्वी लातूर येथे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. दिवेगावकर यांचे मूळ गाव हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे आहे.त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालयातून झाले आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे मात्र कोणती जबाबदारी दिली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, नंतर ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली त्याच बरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी दरोराज नवीन अध्यादेश काढल्यामुळे दीपा मुधोळ मुंडे यांची कामगिरी जिल्हावासियांना भावली नव्हती. दिवेगावकर हे शेजारील जिल्ह्यातील आहेत त्यामुळे आता यांच्या समोर कोरोनाची ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याचे मोठे आवाहन असणार आहे.