उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही काही नागरिकांकडून नीट प्रतिसाद मिळत नाही. तसेच वारंवार सूचना आणि विनंती केल्यानंतर लोक विनाकारण बाहेर फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कळंब शहरात मोकाट फिरणाऱ्या लोकांवरती पोलिसांनी अगळी वेगळी कारवाई करायला सुरुवात केली आहे.
यापुढे तोंडावर मास्क, रुमाल न बांधता बाहेर पडलात तर आता महागात पडणार आहे. कळंबमध्ये ही दृष्य आज पाहायला मिळाली. तोंडाला मास्क न लावता विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना दंड किंवा काठीने मारहाण करण्याऐवजी रस्त्यावर अर्धा तास बसवले जात आहे. पोलिसांनी केलेली ही आगळी वेगळी कारवाई आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली. नागरिक जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने बाहेर पडत असल्यामुळे ही कारवाई केली, असल्याचे कळंब ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी सांगितले. त्यामुळे किमान आता तरी अशा मोक्कार फिरणार्या लोकांवरती वचक बसेल अशी अपेक्षा आहे.