उस्मानाबाद - मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या दोन दिवसांत विजेमुळे तब्बल 7 जनावरे आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असल्याने ऊस जमीनदोस्त झाला आहे. तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेले तसेच काढलेले सोयाबीनच्या पिकाचे देखील नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पावसाने सम प्रमाणात हजेरी लावली असून बहुतांश शेतात पाणी साठले. मरुम परिसरात राशीसाठी काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात गेले असून याचा शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय. भूम तालुक्यातील आंबी, आलियाबादवाडी, वाशी तालुक्यातील कवडेवाडी, सारोळा, पारा उमरगा तालुक्यातील मुरुम परिसरातील बेळंब, आलूर, अचलेर, उस्मानाबाद तालुक्यातील जूनोनी, झरेगाव यासह जिल्ह्यातील अनेक गावात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर परतीचा पाऊस झाला.
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या दरम्यान वादळी वारे सुरू झाले. यानंतर दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह दिवसभर रिमझिम सरी बरसत होत्या. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळातून काढून ठेवलेल्या सोयाबीनचे ढिग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.