उस्मानाबाद - कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. विषाणूचा फटका सर्व क्षेत्रांतील लोकांना बसला असून अनेकांना आपल्या नौकरीवरती पाणी सोडावे लागले. त्यामुळे, अनेक तरुण हैराण झाले आहेत. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या सूरज शिंदे यांनी कोरोनाच्या संकटाला संधी बनवत कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभा केला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून ते महिन्याकाठी लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे.
कळंब तालुक्यातील सात्रा गावातील रहिवासी सूरज शिंदे हे पुणे येथील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. मात्र, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी शासनातर्फे टाळेबंदी करण्यात आली. यात कामधंद्याकरीता शहरात गेलेल्या शिंदे यांना आपले गाव गाठावे लागले. गावी आल्यावर वर्क फ्रॉम होम करीत २ महिने त्यांची नौकरी चालली. त्यानंतर प्रोजेक्ट बंद झाल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. या परिस्थितीवर निराश न होता त्यांनी संधी शोधण्याची धडपड सुरू केली. त्यांनी परिसरात योग्य वाव असणारा पोल्ट्री लेअर फार्मिंगला सुरुवात केली.
शिंदे यांनी प्रथम या व्यवसायासंबंधी माहिती घेतली. व्यवसायासाठी आवश्यक असणारा आर्थिक स्रोत बँकेमार्फत उभा केला व स्वतःच्या शेतजमिनीत हा व्यवसाय त्यांनी सुरू केला. हा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना तब्बल ४५ लाख रुपयांचा खर्च आला. यामध्ये कोंबड्यांसाठी लागणारे दोन मोठे शेड त्यांनी उभारले असून एकाचा उपयोग अंडे देणाऱ्या कोंबडींसाठी केला, तर दुसरे, त्यांना लागणारे खाद्य बनवण्यासाठी. अद्यावत यंत्रामार्फत कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य तयार केले जाते. व्यवसायातून शिंदे यांना दररोज जवळपास ४ हजार ५०० अंड्यांचे उत्पादन मिळत आहे. प्रती अंड्यासाठी दर ठरलेला आहे. येथील स्थानिक बाजार पेठेत ही अंडी विक्री केली जातात. साधारण ५ रुपये दराने एका अंड्याची विक्री होते. सरासरी खर्च वजा करून त्यांना महिन्याकाठी एक ते दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे.
हेही वाचा- मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, आरक्षणासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन