उस्मानाबाद - जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळामुळे जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात जवळपास ९० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या चारा छावण्यात अजूनही सुरू आहेत. मात्र, यांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. पावसाळा संपत आला तरीही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळेच भर पावसाळ्यात चारा छावण्या सुरू आहेत. सध्या ३७ चारा छावण्या सुरू आहेत. या छावण्यांमध्ये १९ हजार ७५६ जनावरांचा समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अगदी महापूर येण्यासारखा पाऊस पडत असला तरी उस्मानाबादमध्ये अद्यापही दुष्काळी स्थिती आहे, असे म्हणायला हरकत नाही. आजपर्यंतच्या झालेल्या पावसाची नोंद 250 मिलिमीटरच्याही पुढे जात नाही. जिल्ह्यात जवळपास 767 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. सर्वात जास्त चारा छावण्या भूम तालुक्यात असून जवळपास 24 छावण्या सुरू आहेत. नऊ चाराछावण्या परंडा तालुक्यात आहेत.