उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. राज्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी जिल्ह्यात फक्त रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. तर काही वेळी दमदार पाऊस होत आहे. मात्र, अद्यापही जिल्हासाठी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्याला 767 मिली मीटर पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे येथील बळीराजा पावसासाठी साकडे घालत आहे.
जिल्ह्यात पडलेल्या आजपर्यंतच्या पावसाची फक्त 216.42 मिली मिटर अशी नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश लहान मोठी धरणे आज घडीला कोरडेठाक आहेत. तर काही धरणाची पाणी पातळीही जोत्याखाली आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असले तरी म्हणावा तसा पाऊस होत नाही. संपूर्ण जिल्ह्याला वार्षिक सरासरी 767 मिली मीटर पावसाची आवश्यकता आहे. मात्र, पावसाचे दोन महिने संपले तरी अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 29.17 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जर अपेक्षित पाऊस झाला नाही तर भविष्यात गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येथील बळीराजा पावसासाठी साकडे घालत आहे.
तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी टक्केवारी-
- उस्मानाबाद - 28.50 टक्के
- तुळजापूर- 34.04 टक्के
- उमरगा - 37.37 टक्के
- लोहार-36.46 टक्के
- कळंब- 23.50 टक्के
- भूम - 23.21 टक्के
- परंडा - 20.73 टक्के
- वाशी- 27.35 टक्के