उमरगा (उस्मानाबाद) - शहरात ''पान टपरी नव्हे ज्ञान टपरी'' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ( Gyan Tapri Umerga ) उमरगा शहरात जागोजागी प्रा. शामराव चव्हाण स्मृती वाचनालय सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पहिली ज्ञान टपरी म्हणजे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. ( Library in Umerga ) या ज्ञान टपरीमध्ये शेकडो पुस्तके, विविध वर्तमानपत्र वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. त्याचा लाभ शहरातील वृद्धांपासून विद्यार्थी घेत आहेत. या आगळ्यावेगळ्या ज्ञान टपरीची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे.
ज्ञान टपरी म्हणजे काय? एखाद्या गावात, शहरात आपण गेल्यास त्या ठिकाणी जागोजागी आपल्याला पान टपरी निदर्शनास येतात. अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांना विविध दुर्धर आजार देखील होऊ शकतात. मात्र, शीतल चव्हाण यांनी पान टपरी ही संकल्पना खोडुन काढत टपरीच्या आकाराचे वाचनालय सुरू केले आहे. जेणेकरून मोबाईलच्या युगात सर्वांना वाचनाची आवड निर्माण होईल. विशेष म्हणजे टपरीमध्ये ठेवण्यात आलेले पुस्तक विनामूल्य वाचता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेतील.
![Different library start in Umarga Osmanabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/umragagyantaprilibrarystory_29032022120505_2903f_1648535705_976.jpeg)
वाचनसंस्कृती वाढावी म्हणून धडपड करणारा युवक - शीतल चव्हाण हे मूळचे उमरगा येथील आहेत. सध्या ते पुणे येथे वकिली व्यवसाय करतात. मात्र, वाचनसंस्कृती वाढावी म्हणून ते सतत धडपड करत असतात. अवघ्या 35 वय असलेल्या शीतल यांनी उमरगा आणि लोहारा परिसरात दहा वाचनालय उभारली आहेत आणि आता चक्क वाचन टपरी सुरू केली आहे. प्रत्येक गाव , वाडी , तांड्यावर पाच-दहा तरी टपऱ्या असतातच. मुळज या गावची अशीच एक टपरी शीतल चव्हाण यांनी मिळवली आणि पुस्तकं ठेवता येतील, अशी त्या टपरीची डागडुजी केली. पुस्तकं वाचायला गर्दी होऊ लागल्यानं लोक आता चक्क टपरीतही बसून वाचायला लागले आहेत.
![Library in Umarga](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/umragagyantaprilibrarystory_29032022120505_2903f_1648535705_786.jpeg)
हेही वाचा - UPSC टाॅपर टीना डाबी घेणार मराठमोळ्या प्रदीप गावंडेंसोबत 7 फेरे, जाणून घ्या कोण आहेत प्रदीप
वर्षश्राद्धेच्या खर्चाला फाटा देत वाचनालयाची स्थापना - शीतल चव्हाण हे आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही संकल्पना राबवत आहेत. 2018साली त्यांनी वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चाला फाटा देत पहिले वाचनालय सुरू केले. यासाठी त्यांच्या मित्रकंपनीचेही सहकार्य त्यांना लाभले. पुस्तके कमी पडू लागल्याने उमरगा आणि लोहारा तालुक्यात ग्रंथदिंडी, ग्रंथतुला असे उपक्रम देखील राबविण्यात आले. नागरिकही या उपक्रमाला छान प्रतिसाद देत आहेत.
पुस्तकातून ज्ञान घेऊन समाजातील एक खंबीर नेतृत्व निर्माण व्हावा, असा आमचा मानस आहे. यापुढे देखील जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशा पद्धतीचे वाचनालय आणि ''पान टपरी नवे ज्ञान टपरी'' ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत, अशी माहिती अॅडव्होकेट शीतल चव्हाण यांनी दिली. सोशल मीडियाच्या या काळात सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी जागोजागी अशा ज्ञान टपऱ्या उभे करणे गरजेचे आहे.