उस्मानाबाद - जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सकाळपासूनच भाविकांची मोठ्या गर्दी दिसून येत आहे. या गावातील बालाघाटाच्या डोंगररांगात निसर्गरम्य वातावरणात वसलेले रामलिंग मंदिर हे ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे
वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे या स्थानाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते - जसा पावसाळा सुरू होतो तसे पर्यटक हिरव्या गर्द निसर्गाच्या वनराईने नटलेल्या रामलिंग मंदिराला भेट देण्यासाठी वर्षभर भाविक गर्दी करतात. त्यातही विशेष म्हणजे श्रावण महिन्यात आणी श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
रामलिंग मंदिराच्या भोवती वळसा घालून जाणाऱ्या नदीमुळे हे पर्यटन स्थळ अधिकच मनमोहक बनते.
ऐतिहासिक महत्त्व - अशी अख्यायिका सांगितली जाते की, रामायण काळात माता सितेचं अपहरण करून रावण जात असताना जटायू पक्ष्याने याच ठिकाणी रावणाशी
घनघोर युद्ध केलं होत, तेव्हा श्री प्रभू श्रीराम यांनी या ठिकाणी या शिवलिंगाची स्थापना करून शिवाची आराधना केल्याची अख्यायिका सांगीतली जाते.
दरम्यान या ठिकाणी दर्शनासाठी बारा ही महिने भाविकांची गर्दी असते.
रामलिंग घाट अभयारण्य म्हणून घोषित - रामलिंग मंदिराचा परिसर हा पूर्ण हिरव्यागार निसर्ग वनराईने आणि जैवविविधतेने संपन्न आहे या परिसराचे संरक्षण करण्यासाठी शासनाने 1937 मध्ये 2237.46 हे.आर. क्षेत्राला रामलिंग घाट अभयारण्य म्हणून घोषित केले. हे स्थळ जिल्ह्यातील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे स्थळ आहे.
धबधबा सातत्याने वाहण्यासाठी नदीवर जागोजागी प्रशासनाकडून बंधारे - रामलिंग मंदिराच्या बाजूने उंचावरून कोसळणारा धबधबा सतत वाहत राहावा यासाठी मंदिराला वेढा घालुन वाहणाऱ्या नदीवर जागोजागी प्रशासनाकडून बंधारे बांधण्यात आलेले आहेत. बंधाऱ्यांमुळे रामलिंग येथील धबधबा हा बारा महिन्यांपैकी आठ ते नऊ महिने सतत संथ गतीने वाहतो. जैवविविधतेने नटलेल्या, हिरव्या गर्द,निसर्ग वैभवाने शोभून दिसणाऱ्या,रामलिंग मंदिराला प्राचिन आणी ऐतिहासिक महत्त्व आहे.