उस्मानाबाद - जिल्ह्यातील आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील पुरातन मंकावती तीर्थकुंड हडपप्रकरणी प्रमुख आरोपी देवानंद रोचकरीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतून पोलिसांनी रोचकरी याला अटक केली असल्याची माहिती उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांनी दिली. मुंबईतील मंत्रालय येथून रोचकरी याला अटक केल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र पोलिसांनी याबाबतची पुष्टी केली नाही.
तुळजापूर पोलिसांची कारवाई -
फरार रोचकरी हे मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने तुळजापूर पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने रातोरात मुंबई येथे जाऊन रोचकरी यांना अटक केली. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी अटकेची माहिती दिली आहे. रोचकरी यांना अटक केल्यावर त्याची नोंद मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात घेण्यात आली असुन त्यांना उस्मानाबाद पोलीस तुळजापूर येथे घेऊन येत आहेत. तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहूल रोटे, पोलीस हवालदार अजय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.
जिल्हाधिकारी यांनी दिले होते कारवाईचे आदेश -
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोर प्राचीन काळातील अनेक जलकुंड आहेत. त्यापैकी मांकावती तिर्थकुंडच्या जागेवर रोचकरी बंधूनी कब्जा केला होता. याप्रकरणी अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तक्रारीची दखल घेत समिती गठीत केली होती. समितीच्या अहवालावरून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंकावती प्रकरणी 4 मुद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा -राज्यात ऑक्सिजन मर्यादित, सण-उत्सवात नियमांचे उल्लंघन करू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन
आदेशावरील स्थगिती उठवल्यानंतर गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला रोचकरी यांनी मंत्रालयातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थगिती आणली व त्यानंतर सुनावणीअंती मंत्री शिंदे यांनी ही स्थगिती उठवली होती. त्यामुळे रोचकरी बंधूवर कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा नोंद झाल्यावर पुढील कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी रोचकरी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळेल या आत्मविश्वासाने व आशेपोटी मंत्रालय गाठले होते. मात्र तिथेच त्यांना उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली, असल्याची माहिती आहे.
बाळासाहेब रोचकरी अद्याप फरार
मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यासह अन्य आरोपीवर तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र त्यातील देवानंद याना अटक केली असून बाळासाहेब रोचकरी फरार आहेत. बनावट कागदपत्रे तयार करण्यात कोण कोण अधिकारी सहभागी होते हे पोलीस तपासात बाहेर येणार आहे. रोचकरी यांना अटक केल्यानंतर खरी या प्रकरणाच्या कारवाईला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. रोचकरी यांच्या गुन्ह्यांची भूमिका न्यायालयात मांडून तपास करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.