उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. खरीप हंगामातील सोयबीन, उडीद, कांदा, ऊस या पिकांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या सोयबीनमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकाला कोंब फुटले आहेत. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पूर्णत: कोलमडून पडला आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आहेत.
यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरिपातील पिके जोमदार होती. आता सोयबीन, मूग, उडीद ही पिके काढणाला आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी-नाल्यांना पुर आले आहेत. परिणामी नदी काठच्या शेतांमध्ये पाणी घुसून शेतजमिनीला तळ्याचे स्वरुप आले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.
कृषी व महसूल विभागाच्या अंदाजानुसार जिल्हातील ४३० गावांना पावसाचा फटका बसला आहे. जवळपास ६८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत मात्र, वेळेवर मदत मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे.