उस्मानाबाद - जिल्हा नियोजन बैठकीमध्ये तरतूद केलेल्या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही याबाबतच्या कारवाईत जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे. तसेच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधिकारी कार्यालय हे भ्रष्टाचाराचे अनेक दलालांचा अड्डा बनला आहे, असा सरळ आरोप भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील आपण शासनाकडे करत असल्याचे आमदार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
हेही वाचा... काहीच नाही झालं.. मग 20 सैनिक मारले कसे, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायतींसाठी साडे नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेद्वारे हा निधी खर्च करावयाचा होता. त्यासाठी पालिकांकडून प्रस्ताव मागवणे आवश्यक होते. मात्र, अशी कोणतीही प्रक्रिया न राबवता जिल्हाधिकारी कार्यालयातून कामे केल्याचे दाखवून परस्पर निधी लाटण्यात आला आहे. त्यास नियमबाह्यपणे प्रशासकीय मंजुऱ्याही दिल्या आहेत. हा प्रकार विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी नेमलेल्या चौकशी समितीनेही समोर आणला असल्याचे आमदार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
दिनांक २४ मे रोजी समितीने विभागीय आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला. त्यानंतर १२ मे रोजी हा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवून दोषींवर नजिकच्या ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्यावर महिना उलटून गेल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही न करता चालढकल सुरु असल्याचा आरोप सुजितसिंह ठाकूर यांनी केला आहे.