उस्मानाबाद- राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. या मत्रिमंडळ विस्तारात आमदार तानाजी सावंत यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सावंत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष केला. सावंत हे यवतमाळ येथून आमदार झाले आहेत तर त्यांचे काम हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात चालते.
परांडा तालुक्यात सावंत यांचा साखर कारखाना आहे. या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांशी जवळीक साधली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबादचे खासदार म्हणून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यात आ. सावंत यांची भूमिका मोलाची ठरली आहे.
शिवजल क्रांतीच्या माध्यमातून परांडा येथूनच सावंत यांनी शिवसेनेच्या राजकीय प्रवासास सुरवात केली. आज जिल्ह्यातील शिवसेना बाबतीतचे सर्वच निर्णय सावंतच घेत असतात. त्यामुळे सावंत यांना मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.