उस्मानाबाद - शहरापासून काही अंतरावर असलेल्या राघूचीवाडी येथील सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोण निवडून येईल, यासाठी करारनामा करून कार्यकर्त्यांमध्येच पैज लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोघांमध्ये कोण बाजी मारणार यावरून ही शर्यत लागली आहे.
राघूचीवाडी येथील शंकर मोरे आणि बाजीराव करवर या दोघांनी शंभर रुपयाच्या बाँडवरती नोटरी करून करारनामा लिहून तयार केला आहे. मतदानापूर्वी सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्टूनवॉर, व्हिडिओवॉर झाले होते. एकमेकांमध्ये चांगलीच चिकलफेक झाली होती. त्यानंतर आता या कार्यकर्त्यांनी केलेला करारनामा वेगळा चर्चेचा विषय ठरत आहे.
शंकर मोरे यांनी शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर निवडून आले तर मोरे यांच्या मालकीची दुचाकी बाजीराव पवार यांना देणार असल्याचे करारनाम्यात आहे. त्याचबरोबर या दुचाकीसंदर्भात कर्ज प्रकरण असेल किंवा काही गुन्हे असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शंकर मोरे यांची राहील, असेही स्पष्ट उल्लेख करारनाम्यात करण्यात आलेला आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते बाजीराव करवर यांनीही राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील निवडून आल्यास आपल्या मालकीची दुचाकी मोरे यांच्या नावे करणार असल्याचा करार नामामध्ये लिहून दिले आहे. या दोघांनी शनिवारी २० एप्रिलला शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा केलेला आहे. निवडणूक निकालानंतर २४ मे रोजी या पैजेची प्रक्रिया पार पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या दोघांचा करारनामा सध्या महाराष्ट्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.