उस्मानाबाद - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोना प्रसार वाढू नये म्हणून देश आणि राज्य पातळीवरून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळेच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे की काय? असा प्रश्न पडत आहे.
जिल्ह्यातील येरमाळा येथील एक रुग्ण टायफॉईड झाला असे म्हणत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर या रुग्णाला टायफॉईड आणि कोरोना हे दोन्ही आजार झाले असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. मात्र, त्यानंतरही रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. त्या रुग्णाला सांगण्यात आले की, तुम्ही रिक्षा करून दुसरीकडे म्हणजे तेरणा महाविद्यालय येथे उभा करण्यात आलेल्या कोविड-19 केंद्रात दाखल व्हा.
हेही वाचा - धक्कादायक! विलगीकरण कक्षातील महिलेवर सुरक्षारक्षकाने केला अत्याचार; नराधमाला अटक
या रुग्णाने सांगितले की, मी येरमाळा येथील रहिवाशी आहे. मला या ठिकाणची माहिती नाही. मी कसा जाऊ, अशी विचारणा केली. त्यानंतर रुग्णालयाकडून असे सांगण्यात आले की, तुमची सोय तुम्ही स्वतः करा. आम्ही तुम्हाला तिथे पोहचवू शकत नाही. त्यानंतर हा रुग्ण दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आवारात व्याकूळ होऊन बसला होता. याबाबतची माहिती 'ईटीव्ही भारत'ला मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी.के. पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मात्र, त्यांनी समर्पक उत्तर देण्याचे टाळले आणि तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करा, असे म्हणत डॉ. पाटील यांनी हात वर केले.
हेही वाचा - मुंबई, महाराष्ट्रासाठी 'ठाकरे' ब्रॅण्ड टिकला पाहिजे; शिवसेनेची मनसेला साद
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के पाटील यांच्या निष्क्रिय भूमिकेनंतर आम्ही काही वेळानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, मला त्या रुग्णाविषयी माहिती मिळाली आहे. या रुग्णाला दाखल करून घेण्यास सांगितले असून सदर रुग्णाला रिक्षाने जावा, असे सांगितले असेल तर ते चुकीचे असून यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. रुग्णाच्या प्रकृतीवरून त्याला कुठे पाठवायचे ते ठरवले जाते. त्याचबरोबर रुग्णाचे स्वतःचे वाहन असेल तर तो जाऊ शकतो. मात्र, रुग्णालयाने याबाबत काळजी घेऊन विचारपूस करूनच पुढील निर्णय घ्यायला हवा होता.