उस्मानाबाद - वाशी तालुक्यातील बनगरवाडी येथे विहिरीचा कठडा कोसळल्याने २ विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत ८ मुले बचावली आहे. विवेक लांडगे आणि करण बोडके असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहे.
बनगरवाडीच्या शिवारामध्ये असलेल्या एका विहिरीवर गावातील ८ मुले सकाळी पोहण्यासाठी गेली होती. यापैकी सहाजण विहिरीमध्ये पोहत होती, तर विवेक लांडगे (१३) व करण बोडके (१३) हे दोघे विहिरीच्या वरच्या बाजूला काठड्यावर बसून पोहत असलेल्या अन्य ६ जणांना पहात होते. याच वेळी दोघेही मुले बसलेल्या कठड्या खालची जुण्या पद्धतीने दगड, मातीने बांधलेली विहिरीची दरड पाण्यामध्ये कोसळली. त्याचबरोबर, कठडा देखील कोसळल्याने त्यावर बसलेले करण आणि विवेक हे दोघेही पाण्यामध्ये पडले व दरडेच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुदैवाने दरड कोसळताना पाण्यामध्ये पोहत असलेली बाकीची ६ मुले हे विहिरीच्या दुसऱ्या बाजूला असल्याने ते बचावले. घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी दाखल झालेले तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे व पोलीस निरीक्षक उस्मान शेख व इतर कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विद्युत मोटारी चालू करत विहिरीतील पाणी बाहेर काढून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे गावात दु: खाचे वातावरण पसरले आहे.