नाशिक - नांदगाव तालुक्याला शनिवारी मुसळधार अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जमिनदोस्त झाली. काँग्रेसच्या जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर यांनी ठिकठिकाणी बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. पिंपरखेड येथील राजू चाकणकर यांच्या शेताची झालेली दुरवस्था आणि हतबल कुटुंब पाहून स्वतः शेतकरी असलेल्या अश्विनी आहेर यांना रडू कोसळले.
नांदगाव तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. उन्हाळ्यात जवळपास सर्वच गावांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा आणि इतर पिके कापणीच्या अवस्थेत आहेत. मात्र, शनिवारी सायंकाळी या परिसराला मुसळधार पावसाने तडाखा दिला. शेतात पाणी आणि चिखल साचल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
हेही वाचा- राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या अंदाजपत्रकाला लवकरच मान्यता'
या अस्मानी संकटामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी इतर अधिकारीही त्यांच्या सोबत होते. अश्विनी आहेर यादेखील शेतकरी असल्याने त्यांना या समस्येची जाणीव होती. त्यामुळे त्यांना शेतातच रडू कोसळले. ही स्थिती पाहून जिल्हा परिषदेचे अधिकारी देखील काही काळासाठी गोंधळले.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, अंतिम आकडेवारी आल्यानंतर नुकसानाचे प्रमाण झाले याची आकडेवारी समोर येईल. नांदगाव तालुक्यातील गहू, हरभरा, मका, द्राक्षे, कांदा सगळ्याच पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.