नाशिक- महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला. ११७ व्या तुकडीत ६८९ पोलीस उपनिरीक्षक आज पोलीस सेवेत दाखल झालेत. पोलीस खात्यात येताना प्रत्येक जण वेगवेगळी स्वप्न घेऊन येत असतात. मात्र, या तुकडीतील दीपेश विलास शिंदे हे फक्त नोकरी म्हणून नाही तर शहीद वडील विलास शिंदे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दाखल झाले आहेत.
३१ ऑगस्ट २०१६ रोजी मुंबई येथील वांद्रे पश्चिम येथे वाहतूक पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांची काही समाजकंटकांनी डोक्यात रॉड घालून हत्या केली होती. आपला मुलगा दीपेश हा पोलीस अधिकारी व्हावा, अशी विलास शिंदे यांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेला दिपेशने उराशी बाळगत अथक प्रयत्न केले व आज पीएसआयची वर्दी अंगावर परिधान केली. देशसेवेसाठी नेहमीच तत्पर राहील. आज वडील असते तर मला पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात बघून त्यांना अभिमान झाला असता, अशी प्रतिक्रिया दिपेशने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दिपेश पीएसआय होत असतानाच कौतुक सोहळा बघण्यासाठी त्याची आई, मामा सहपरिवार उपस्थित होते.
हेही वाचा- '....म्हणून आपण एकाच बॅचचे'