नाशिक - देवळाली येथे लष्कर भरतीसाठी शेकडो किलोमीटर दूरवरून तरुण दाखल झाले आहेत. मात्र, सुविधांअभावी त्यांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गर्दीचे योग्य नियोजन नसल्याने काही जणांना पोलिसांचा मार देखील खावा लागला. यामध्ये ३ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
देवळाली येथील 116 इन्फ्रा पॅरा बटालियनची भरती सुरू आहे. अवघ्या 63 जागांसाठी 20 ते 21 हजार विद्यार्थी देशभरातून दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी संपूर्ण रात्र रस्त्याच्या कडेला आणि बस थांब्यावर काढली. एवढ्यावर त्यांचा त्रास थांबला नाही, तर गर्दीचे योग्य नियोजन देखील न झाल्याने अनेकांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. यामध्ये ३ विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, देवळाली आणि भगूरकरांनी माणुसकीचे दर्शन घडवले. ठिकठिकाणी पुरीभाजी, मसाले भात आणि पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच निवाऱ्यासाठीसुद्धा समाज मंदिर, दुकानांचे चौथरे, मंदिर विद्यार्थ्यांनी भरून गेली होती. या भरतीसाठी राज्यातूनच नव्हे, तर आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह देशभरातून हजारो बेरोजगार तरुण नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सोल्जर जनरल ड्युटी, हेअर ड्रेसर, हाउस किपिंग अशा वेगवेगळ्या ट्रेडच्या 63 जागांवर भरती आज याठिकाणी पार पडत आहे. आजपासून ६ दिवस ही भरतीप्रक्रिया चालणार आहे.
लष्कर भरती प्रक्रिया प्रत्येक राज्यात राबवण्यात याव्या. जेणेकरून विद्यार्थ्यांचे पैसे, वेळ वाया जाणार नाही. तसेच त्यांची हेळसांड होणार नाही, असे मत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत लष्कर प्रमुखांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.