नाशिक - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनेस मंत्री गिरीश महाजन आणि तानाजी सावंत जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सचिव कल्याणी रांगोळे यांनी केली. यासंदर्भात युवक काँग्रेसच्यावतीने नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला निवेदन देत बांधकाम साहित्य घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाप्रकरणी नाशिकच्या डीएसओनी अहवाल दिला होता. हा अहवाल विचारात न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे त्या घटनेला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच नाशिकच्या डीएसओनी दिलेल्या अहवालाची मंत्री महोदयांनी तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, युवक काँग्रेसचे पदाधिकारी विटा सिमेंट आणि बांधकामाचे साहित्य पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देणार असल्याचे यावेळी सांगितले.