नाशिक - पाेलिसांच्या नियमानुसार पेट्राेल भरण्यासाठी दुसऱ्या तरुणाचे हेल्मेट मागून ते देण्यास नकार दिला म्हणूण तिघांनी त्याला जबर मारहाण केल्याची घटना जेलराेड येथील आढाव पेट्राेल पंपावर घडली.या प्रकरणी नाशिक राेड पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टाेळक्याचा शाेध घेतला जात आहे.
मारहाणीत हेल्मेटचे पडले तुकडे -
आकाश विश्वकर्मा (वय १९, रा. पंचकगाव, जेलरोड) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो हेल्मेट घालून आढाव पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आला होता. त्याचवेळी तीन युवक आले. एकाने आकाशकडे पेट्रोल भरण्यासाठी थाेडावेळ हेल्मेट देण्याची मागणी केली. मात्र, आकाशने आपले हेल्मेट देण्यास नकार दिल्याने त्यांना राग आला. तिघांनी आकाशला दमदाटी व शिवीगाळ केली. एकाने आकाशचे हेल्मेट हिसकावून डोक्यात मारल्याने आकाश जखमी झाला. मारहाणीत हेल्मेटचे तुकडे पडले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू -
दरम्यान हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आकाशच्या वडिलांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी तत्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास पोलिस त्वरित कारवाई करतात. मात्र ग्राहकांना मारहाण झाली तर कारवाई होत नाही हे अन्यायकारक आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पेट्रोल पंप चालकाने सीसीटीव्ही देण्यास नकार दिला आहे.