नाशिक - येवला शहरात कोरोनाबाधित महिला आढळल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संपूर्ण शहर सील करण्यात येणार आहे. पुढील चार दिवस अत्यावश्यक सेवांसह संपूर्ण येवला शहर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला.
नागरिकांना चार दिवसानंतर भाजीपाला, किराणा सामान तसेच रमजान उपवासाची फळे विक्रेत्यांसह समाजसेवकांच्या माध्यमातून घरपोच देण्यात येणार आहेत. बुधवार 29 एप्रिलपासून विंचुर चौफुलीवरील मेडिकल सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. त्याचप्रमाणे खासगी दवाखान्यालगत असलेले मेडिकल खासगी डॉक्टरांच्या ओपीडी वेळेनुसार सुरू राहणार आहेत.
पीठाची गिरणी, दैनंदिन दूध पुरवठा सकाळी व सायंकाळी सहा ते आठ या कालावधीत चालू राहणार असून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण घरपोच दैनंदिन सुरू राहिल. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला लिलाव 3 मेपर्यंत बंद राहणार आहे.