नाशिक - पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
नाशिकच्या ध्रुवनगर येथे जून 2018 ते जुलै 2019 या कालावधीत ही घटना घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला संशयित विनोद बाबा याच्यासह राजेंद्र गायकवाड, केशरबाई पाटील आणि नाना या आरोपींनी गंडा घातला. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पैशाचा पाऊस पाडू, त्यासाठी तुला पूजा करावी लागेल असे सांगितले. पीडिता पैशाच्या लोभापायी पूजा करण्यास तयार झाली. त्यानुसार संशयितांनी तिच्या घरात तसेच शिर्डी आणि सापुतारा येथे पूजा करण्याचा बहाणा केला. विनोद बाबा याने पीडितेसोबत लग्न केल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केले. त्यात ती गर्भवती राहिल्याने तिचा अनाधिकृतपणे गर्भपात करण्यात आला.
त्यानंतरही संशयितांनी पीडितेला शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने घरात थांबण्यास भाग पाडले. अखेर स्वतःची सुटका करून घेत पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उज्वला सातपुते तपास करत असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे.