नांदगाव (नाशिक) - तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले. यामुळे न्यायडोंगरी येथील हवालदिल झालेल्या महिलेनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदाबाई काकळीज असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह नांदगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.
औषध पिऊन केली आत्महत्या -
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी या भागात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. त्यात मंदाबाई काकळीज यांच्या आठ एकरवरील मका, कांदे व कापूस वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. नातेवाईक यांच्याकडून घेतलेले उसने पैसे व बँकेकडील कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत काकळीज यांनी चार दिवसांपासून अन्नपाणी सोडले व आज (शुक्रवार) सकाळी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. अशी त्यांच्या मुलाने नांदगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नांदगाव ग्रामीण रुग्णालयात आणला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - नर्सचे कपडे परिधान करून रूग्णालयातुन बाळ पळवले, 24 वर्षीय महिलेला अटक