येवला (नाशिक) - शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंगणगाव येथे सासरच्या छळाला कंटाळून पूजा संदीप आठशेरे (वय २२) या विवाहितेने शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ४९८ अ, ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा आठशेरेला तिचा नवरा संदीप दगडू आठशेरे, सासरा दगडू कारभारी आठशेरे, सासू मंगल दगडू आठशेरे, राधाकिसन दगडू आठशेरे हे सर्वजण नवऱ्याला शोभत नाही, व्यवस्थित कामधंदा करत नाही, माहेरहून कानातील झुबे कुडके करून आणले नाही, या कारणावरून त्रास देत होते.
शेतात पाईपलाईन करण्यासाठी व रोटर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणले नाही, या कारणासाठी मुलीला सासरचे लोक शारीरिक व मानसिक त्रास देत होते. त्या जाचाला कंटाळून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार बाबासाहेब विठ्ठल भारसाखळ (५०, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर) यांनी दिली आहे.
भारसाखळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली. या नंतर सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.