नाशिक - जगासह देशात व राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहेत. त्यामुळे वधू व वर पित्याच्या अडचणी वाढल्या आहेत. मनमाडसह, मालेगाव, येवला, चांदवड, नांदगांव, सटाणा यासह नाशिकच्या ग्रामीण भागातील 31 मार्चपर्यंत होणारे सर्व लग्नं व स्वागत समारंभ नागरिकांनी स्वतःहून रद्द केले आहेत. त्यामुळे वर पित्यांना आमच्या मुलाच्या लग्नाला येवू नये, असे सांगण्याची वेळ आली आहे.
ऐन वेळी लग्न रद्द करण्यात आल्यामुळे भावी वधू-वरांचा हिरमोड झाला आहे. तर काहींचा लग्न व स्वागत समारंभाची तयारीसाठी केलेला खर्च देखील वाया गेला आहे. मंगल कार्यालय, कॅटरर्स व इतर कामासाठी आगावू स्वरूपात दिलेली रक्कम परत कशी मिळवायची? हा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.
हेही वाचा - नाशिकच्या वेशीवर कोरोना रोखणार : टोलनाक्यांवर प्रवाशांची तपासणी, तहसिलदारही रस्त्यावर उतरून सक्रिय
मनमाड शहरातील व्यापारी हाजी अनवर खान त्यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त त्यांनी 21 मार्च रोजी स्वागत समारंभ ठेवला होता. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. या समारंभाला सुमारे 5 ते 6 हजार नागरिक उपस्थित राहणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून त्यांनी स्वागत समारंभ रद्द केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, या निर्णयामुळे नियोजित वधू वर यांचा मात्र हिरमोड झाला आहे. कारण, लग्न हे आयुष्यात एकदाच होणारी गोष्ट आहे. त्यामुळे सर्वजण आपले लग्न अविस्मरणीय व्हावे, अशीच अपेक्षा ठेवतात. मात्र, कोरोनामुळे आपले लग्न अविस्मरणीय झाले नाही, असे वधू वर सांगत आहे.
सध्या लग्न सराई सुरू असल्याने मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक लग्न सोहळे व स्वागत समारंभ होते. मात्र, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी 31 मार्चपर्यंत कोरोनामुळे सर्व लग्न व स्वागतावर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी नागरिक स्वतःहून करत आहेत.
हेही वाचा - CORONA : नाशकात 20 देशातून आलेल्या 102 जणांचे विलगीकरण