नाशिक - वादाचे पर्यावसन हाणामारीत झालेले असताना पाण्यात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सातपूरच्या शिवाजीनगर येथील पाझर तलावात घडली आहे. या घटनेत मुदफिर मेक्रानी या तरूणाचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 27) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तोल गेल्याने दोघेही पाझर तलावात पडले
काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चार दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी हे युवक शिवाजीनगर परिसरातील पाझर तलावाजवळ जमले. मात्र, वाद वाढत गेल्याने यांच्यामध्ये हाणामारी झाली. हे भांडण तलावाच्या बाजूला चालु होते. दरम्यान, तोल गेल्याने दोघेही पाझर तलावात पडले. त्यानंतर पाण्यात पडल्यानंतरही दोघांमध्ये हाणामारी सुरु होती.
गंगापूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला
भांडण चालू असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. ही घटना लक्षात येताच इतर मुलांनी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून प्राथमिक चौकशी करून दाेघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तसेच, गंगापूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Aryan Khan Drug Case आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी