जायखेडा (नाशिक) - लॉकडाऊनच्या काळात गरजू व्यक्तींच्या अन्न पाण्याबरोबरच पक्षांच्या दाना-पाण्याची सोय करून बागलाण तालुक्यातील जायखेडा ग्रामपंचायतने भूतदया जोपासली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक होत आहे.
कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. या काळात मुख्य बाजारपेठेतील हॉटेल व दुकाने बंद असल्याने येथील झाडांवरील पक्ष्यांच्या अन्नपाण्याची गैरसोय झाली आहे. उन्हाची वाढती तीव्रता त्यातच नेहमी मिळणारे अन्नपाणी दुरापास्त झाल्याने चिमण्या, कावळे, साळुंकी आदी पक्षी सैरभैर झाले आहेत. स्वतःला पक्षीमित्र म्हणून मिरवून घेणारेही अशा वेळी गायब झाल्याने या मुक्या जीवांना वाली उरला नसल्याने या मुक्या जीवांची व्यथा जाणून घेऊन सरपंच शांताराम अहिरे यांनी पक्षांसाठी दानापाण्याची सोय केल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी वेळोवेळी झाडांखाली दाणे व पाणी ठेऊन काळजी घेत आहेत. या परिसरातील विविध पक्षी आपली तृष्णा व भूक भागवून आनंदाने किलकीलाट करीत आहेत. बाजार पेठेतील दुकाने व हॉटेल सुरू असतांना पक्षांसाठी अनेकांनी दानापाण्याची सोय केली होती. मात्र बंदच्या काळात पक्षांची काहिशी गैरसोय झाली आहे. गरजूंना किराणा व धान्य वाटप करतांना मला अचानक याची जाणीव झाली. व तात्काळ पक्षांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली असे सरपंच शांताराम अहिरे यांनी सांगितले.